Home मराठवाडा ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांत निर्माण होतोय दुरावा – प्रा. चिंचखेडकर

ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांत निर्माण होतोय दुरावा – प्रा. चिंचखेडकर

186

जालना – लक्ष्मण बिलोरे

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यात दुरावा निर्माण होत आहे, अशी खंत प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांनी येथे बोलताना व्यक्त केली. काही अटीवर ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यात यावे, यासाठी सरकारने पाऊले उचलण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून प्रा. चिंचखेडकर यांचा स्वामी विवेकानंदांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश राऊत, चंद्रकांत हंडे, अभिजीत रणनवरे, रोहित आगळे, ऋत्विक इंगळे, सागर मांडे, पुष्कर जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. चिंचखेडकर पुढे म्हणाले की, खरेतर ऑनलाइन शिक्षण ही आपली संस्कृतीच नाही. मात्र कोरोना परिस्थितीमुळे सरकारला ही पद्धत अवलंबावी लागली आहे. ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद आणि संपर्क तुटत चालला आहे. प्रत्यक्ष अध्यापनातूनच विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडतो. कारण वेळच्यावेळी त्यांना वर्गातच आपल्या शंकांचे निरसन करून घेता येते. शिक्षकांसमोर बसून विषय समजून घेताना कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष लक्ष असते. ऑनलाइनमध्ये अनेक अडचणी आहेत. प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतीलच असे नाही असतील तर इंटरनेटमधील अडथळ्यांमुळे एकाग्रता निर्माण होत नाही, किती विद्यार्थी ऑनलाइन सहभागी होतात, झाले तरी ते किती एकाग्र होऊन अध्ययन करतात, पालकांचेही त्यांच्यावर किती लक्ष आहे, तेतरी कुठे – कुठे लक्ष ठेवणार, त्यांनाही इतर कामे असतात ना! विद्यार्थ्यांनी मोबाईलसमोर किती वेळ बसायचे, हाही प्रश्न आहे. तासनतास मोबाईलवर अभ्यासामुळे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत चालली आहे. आजवरच्या इतिहासात परीक्षा न देताही दहावी आणि बारावीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रमाणेच यंदाही परीक्षा होणार नाही आणि आपण अभ्यास न करता उत्तीर्ण होऊ, असा दृष्टिकोन बळावत चालल्याने अभ्यास न करण्याची सवय लागू शकते आणि ही बाब भविष्यातील उच्च शिक्षणासाठी हितकारक ठरणार नाही. खरेच हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो. टर्निंग पॉईंट असलेल्या दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षा न होण्यामुळे आपल्यातील गुणवत्ता कशी सिद्ध करणार, असा प्रश्न यावेळी प्रा. चिंचखेडकर यांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता, आता कोरोनासोबतच जगावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने फक्त शिक्षणाच्या बाबतीतच निर्बंध लादणे योग्य नाही. आजघडीला काही नियमांच्या अधीन राहून सर्व काही सुरू आहे, त्याचप्रमाणे शिक्षणही पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन सुरू करावे, त्यासाठी दिवसाआड वर्ग भरवावे किंवा विशिष्ट विद्यार्थी संख्या निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून शिक्षणावरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने सरकारने ऑफलाइन शिक्षणासाठी योग्य तो निर्णय घ्यावा; जेणेकरून विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतील, सोबतच शिक्षक-विद्यार्थ्यांतील संवाद कायम राहून त्यातून उद्याचे आदर्श नागरिक घडतील, असे प्रा. चिंचखेडकर म्हणाले.
यावेळी बोलताना विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश राऊत म्हणाले की, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाचे शिल्पकार असून, त्यांच्याप्रती प्रत्येकाने आदर बाळगावा. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी कायम आपल्या शिक्षकांच्या संपर्कात राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊन योग्य दिशेने शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन केले.