
धामणगाव रेल्वे / मंगरूळ दस्तगीर – असोत गरीब किंवा श्रीमंत ! मुलास विद्या शिकवाव्या अनेक…!

गावाने संपत्ती पुरवावी अधिक…!
याच मार्गे !! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत शिक्षणाचे व अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगताना गावाने व गावकऱ्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी अधिक पैसा खर्च करावा मुलांच्या सार्वजनिक शिक्षणासाठी पैसा दान द्याव़ा हे राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेत लिहून ठेवले आहे.
मंगरूळ दस्तगीर येथे बऱ्याच वर्षापासून एक समाज मंदिर बांधून ठेवले होते .बऱ्याच वर्षापासून समाज मंदिर पडून होते .मंगरूळ या गावांमध्ये पोलीस भरती व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे काही होतकरू तरुण नवनियुक्त सरपंच सतीश हजारे यांच्याकडे गेले व या समाज मंदिराच्या खोलीत अभ्यासिका सुरू करण्याचा मानस असल्याचे सरपंच त्यांना सांगताच त्यांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले सार्वजनिक अभ्यासिका साठी खोलीची डागडुजी करून समाज मंदिराची खोली उपलब्ध करून दिली परंतु ह्या समाज मंदिराच्या खोलीमध्ये लाईट उपलब्ध नव्हती. बरेच मुले व मुली विना लाईट व विनापंख्याचे खोलीत अभ्यास करत होते.
मंगरूळ दस्तगीर येथे नवनियुक्त ठाणेदार सुरज तेलगोटे रुजू होतात या अभ्यासिकेला मदत करण्याची मागणी येथे नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठाणेदाराकडे केली. स्वतः ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी अभ्यासिकेमध्ये जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी लाईट व फॅन ची व्यवस्था नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली .क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विद्यार्थ्यांना लाईट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व एका आठवड्याच्या आत विद्यार्थ्यांना अभ्यासीकेमध्ये लाईट उपलब्ध करून दिली त्याच बरोबर स्वतः खर्च करून लाईट फिटिंग ,लाईट, दोन फॅन , स्विच,ची सुद्धा व्यवस्था करून दिली .
या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणारी मुले हे गरीब कुटुंबातील आहे त्यांच्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी ठाणेदार सुरज तेलगोटे यांचे आभार व्यक्त केले .या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे सुद्धा आव्हान ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्या संकल्पनेनुसार पोलीस स्टेशनच्या आवारात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याच्या संकल्पनेला दुजोरा देत ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी विद्यार्थ्यांना केलेली मदत म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे परिसरातून बोलल्या जात असून मंगरूळ दस्तगीर चे सरपंच व ठाणेदार यांच्या कार्याचे कौतुक परिसरात केले जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत लिहिल्या प्रमाणे “जीवनाचे उज्वल अंग!
मुले शिकतील होऊनी दंग!!
वाढेल गावाचा रागरंग !!
म्हणालं तैसा”. !!
याप्रमाणे गावाच्या विकासासाठी मुलांच्या शिक्षणासाठी ठानेदारांचाआदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही शासकीय सेवेत असणारे तसेच गावातून शिक्षण घेऊन बाहेर मोठ्या शहरात वास्तव्य करत असलेल्या गावातीलच अधिकाऱ्यांनी सुद्धा गरीब मुलांच्या शैक्षणिक कार्यास मदत करावी असे आवाहन सरपंच सतीश हजारे यांनी व्यक्त केले आहे.










































