
कारागृह प्रशासनात उडाली खळबळ ,
अमीन शाह
नागपूर : नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी आणि शेखूसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्रयोगशाळेतून प्राप्त झाला . यामुळे मध्यवर्ती कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे . त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत . सर्वांची प्रकृती स्थिर आहे , मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना या सर्व बंदिवानांना कारागृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे . कोरोनाचा उद्रेक उपराजधानीत झाल्यानंतर जुलै २०२० मध्ये कारागृहात कोरोना विषाणूने आपले अस्तित्व दाखविणे सुरू केले होते . कारागृहात सहाशेवर कोरोनाबाधित आढळून आले होते . केवळ एकाला बाधा झाल्यामुळे अख्खे कारागृह कोरोनाच्या विळख्यात सापडले होते . कोरोनाचा उद्रेक झाला होता , परंतु मृत्यूपासून कारागृह दूर होते . या उद्रेकावर कारागृह प्रशासनाने वैद्यक तज्ज्ञांच्या उपचार यंत्रणेतून विजय मिळवला . मात्र पुन्हा एकदा कारागृहात कोरोनाची एन्ट्री झाली . यामुळे येथे भीतीचे वातावरण पसरले आहे . उपराजधानीतील दैनंदिन व्यवहार सैल होत असताना पुन्हा एकाचवेळी पाच बंदिवान कोरोनाबाधित आढळले . यात दोन दिवसांपूर्वी अरुण गवळीची प्रकृती खालावली होती . त्यामुळे गवळीसह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली . या चाचणीचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला . गवळीसह पाच जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा अहवाल पुढे आला . यांना कारागृहात वेगवेगळ्या बॅरेकमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे .










































