
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवास आजही सोपा नाही. अंतर, अपुरी साधनसामग्री आणि वाहतुकीच्या मर्यादा यामुळे अनेकांना शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागते. मात्र निंभोरा गावातील अकरावीची विद्यार्थिनी जान्हवी महाजन हिने या अडचणींवर मात करत आपल्या शिक्षणाचा मार्ग स्वतःच मोकळा करून दाखवला आहे.
निंभोरा गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर शेतात वास्तव्य असलेल्या जान्हवीसाठी रोजचा कॉलेजचा प्रवास मोठे आव्हान बनला होता. पाचोरा महाविद्यालयाकडे जाणारी एसटी बस तिच्या शेताजवळून जात असली, तरी अधिकृत थांबा गावातील बसस्थानकात असल्याने तिला दररोज दीड किलोमीटर पायी चालत जावे लागत होते. पहाटेच्या अंधारात किंवा संध्याकाळच्या वेळी हा प्रवास करताना सुरक्षिततेचे प्रश्नही निर्माण होत होते.
या सततच्या त्रासामुळे शिक्षण सोडण्याचा विचार कुटुंबाच्या मनात येऊ लागला. मात्र जान्हवीने हार मानली नाही. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अडचणी थेट परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या घटनेची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी त्वरित जळगाव व छत्रपती संभाजीनगर विभागातील परिवहन अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.
यानंतर अवघ्याच काही दिवसांत जान्हवीच्या कुटुंबाला आनंददायक बातमी मिळाली. जळगाव विभागीय नियंत्रक दिलीप बंजारा व पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी थेट तिच्या शेतात भेट देत तेथेच नव्या बसथांब्याला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. प्रशासनाच्या या तत्काळ प्रतिसादामुळे कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.
आज शेताच्या बांधावरच एसटी बसचा थांबा उपलब्ध झाल्याने जान्हवीचा शिक्षणप्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ झाला आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासमोरील मोठा अडथळा दूर करण्यात तिच्या धाडसाची आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. ही घटना केवळ एका विद्यार्थिनीचे भविष्य उज्ज्वल करणारी नसून, ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधणारी आणि त्यावर परिणामकारक उपाय शक्य असल्याचे दाखवणारी ठरली आहे.












































