
यवतमाळ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. समता पर्व प्रतिष्ठान, साहित्य सांस्कृतिक अकादमी पुणे आणि आई मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे.
जीसीसी–टीबीसी या संगणक प्रशिक्षणाचा खर्च साधारणतः २५ हजार रुपये येतो. आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी हे प्रशिक्षण घेऊ शकत नसताना, या 100 विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च संबंधित संस्थांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यापूर्वीही डॉ. कांबळे यांच्या प्रेरणेतून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आहे. विशेषतः आदिवासी, पारधी, कोलाम, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक घटकांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीमुळे अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
या वर्षी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आचार्य कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र, यवतमाळ येथे संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.











































