
हाँगकाँग येथे झालेल्या सोहळ्यात ५० हजार युएस डॉलर्सचे बक्षीस व सन्मानचिन्ह
यवतमाळ – येथील नंददीप फाऊंडेशनमार्फत संचालित बेघर मनोरूग्ण निवारा केंद्राचे अध्यक्ष संदीप शिंदे यांना हाँगकाँग येथील ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३४५०’ तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले. हाँगकाँगमधील सिम शा सुई येथील पंचतारांकित हॉटेल हॉलिडे इनमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात संदीप शिंदे यांना ५० हजार युएस डॉलर्सचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
हाँगकाँग येथील रोटरी डिस्ट्रीक्ट ३४५० या संस्थेच्या वतीने २०१२ पासून जगभरात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची निवड करून सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत भारतातीत सिंधुताई सपकाळ, डॉ. प्रकाश आमटे, राजेंद्र धामणे, डॉ. कोल्हे दाम्पत्य आदी सहा सामाजिक कार्यकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यवतमाळ येथील संदीप शिंदे हा पुरस्कार मिळविणारे सातवे भारतीय असून, या पुरस्काराने नंददीप फाऊंडेशनच्या बेघर मनोरूग्ण केंद्राचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. विशेष म्हणजे सामाजिक काम सुरू केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत हा पुरस्कार मिळविणारे संदीप शिंदे हे द वन अवार्डच्या इतिहासातील पहिले तरूण व्यक्ती ठरले.
या पुरस्कारासाठी जगभरातील १७९ देशांमधून प्रस्ताव आले होते. तीन विविध चमूतील परिक्षकांकडून प्रस्तावांची पडताळणी, हाँगकाँग रोटरीच्या भारतातील प्रतिनिधींमार्फत कामाची प्रत्यक्ष पाहणी, प्राथमिक आणि अंतिम मुलाखत असे टप्पे पार करत संदीप शिंदे यांची अंतिम तीन विजेत्यांमध्ये निवड झाली. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे अंतिम मुख्य परिक्षक म्हणून अलिबाबा इंटरप्रिन्युअर्स फंडच्या कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किंडी चॉऊ, युनिसेफ हाँगकाँग ॲडवोकसी कमिटीचे अध्यक्ष इवॅन च्यू, द मेकाँग लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू फ्रिडमॅन यांनी काम पाहिले. या मुख्य परिक्षकांनी भारतातून एकमेव संदीप शिंदे, पाकिस्तानमधील सईदा गुलाम गिलाणी आणि मूळ इटलीमधील व कंबोडियात सेवाकार्य करणारे जिनरिको टेस्टरी या अंतिम तीन विजेत्यांची निवड केली. या तिघांनाही ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवार्ड’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात ‘द वन ह्युमॅनिटेरियन अवार्ड’चे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डेविड हेरिलेला, द वन फिलीपाईन्सचे अध्यक्ष रेफल एम. गॅर्सिया (थर्ड), रोटरी डिस्ट्रीक्ट ३४५०च्या गव्हर्नर कॅसी चेंग यांच्यासह मास्टर ऑफ सेरमनी सॅरिका चॉय, हाँगकाँग अवार्ड ॲम्बेसिडर सिसिलीया वँग, इंटरनॅशनल अवार्ड ॲम्बेसिडर डॉनी येन जी डॅन यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास हाँगकाँगमधील उद्योजक, क्रीडा, चित्रपट, माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात स्थानिक पातळीवरील हाँगकाँग अर्वाडचेही वितरण करण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमात संदीप शिंदे यांच्या नंददीप बेघर मनोरूग्ण निवारा केंद्राच्या कामाचा विशेष गौरव करून चित्रफित दाखविण्यात आली. तसेच ‘द वन’ या विशेष पुस्तकातही संदीप शिंदे यांच्या कार्याचा समावेश करून गौरव करण्यात आला आहे. उपस्थितांनी संदीप शिंदे यांचे काम बघून त्यांची पाठ थोपटली. कार्यक्रमास उपस्थित हाँगकाँगमधील अनेक उद्योजक, मान्यवरांनी संदीप शिंदे यांची भेट घेवून बेघर मनोरूग्ण निवारा केंद्राचे काम समजून घेतले व मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना संदीप शिंदे यांनी ‘द वन ह्युमॅनिटेरियन’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नंददीप बेघर मनोरूग्ण निवारा केंद्रातील सर्व ‘प्रभूजीं’सह या कामात तन, मन, धनाने सहकार्य करणारे सहकारी, सेवा देणारे डॉक्टर्स, निवारा केंद्रातील सेवेकरी आणि यवतमाळकरांना समर्पित करत असल्याचे सांगितले. प्रभूजींच्या आशीर्वादाने मिळालेल्या या पुरस्काराच्या रकमेतून बोथबोडण येथे निवासी संकुलासह बेघर मनोरूग्णांना आरोग्य सुविधा आणि कौशल्य विकास प्रकल्प सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. पत्नी नंदिनी, मुलगी हर्षाली आणि सोबत काम करणारे सर्व सहकारी यांच्या कष्टाचे जीच या पुरस्काराने झाले. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून, अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे संदीप शिंदे म्हणाले. या पुरस्कारासाठी मुंबई येथील रोटरीचे डॉ. गोविंद पाटील, प्रशांत गादेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच यवतमाळचे विनय गावंडे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यात संदीप शिंदे, नंदिनी शिंदे, हर्षाली शिंदे यांच्यासह नंददीप फाऊंडेशनचे ॲडव्हायजरी कमिटीचे सदस्य नरेंद्र पवार, डॉ. प्रशांत गावंडे, नितीन पखाले, आनंद कसंबे, डॉ. कविता बोरकर हे सहभागी झाले होते. या आंतराष्ट्रीय पुरस्काराबद्दल संदीप शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, महाराष्ट्रासह देशातील विविध सामाजिक संघटना, नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.











































