Home यवतमाळ विद्यालय माजी विद्यार्थ्यांकडून अनाथ, वंचित व निराश्रित बालकांसाठी दिवाळीचा आनंदोत्सव

विद्यालय माजी विद्यार्थ्यांकडून अनाथ, वंचित व निराश्रित बालकांसाठी दिवाळीचा आनंदोत्सव

212

यवतमाळ, दि. १३ ऑक्टोबर – यवतमाळ जिल्ह्यातील विविध अनाथ, वंचित आणि निराश्रित बालगृहांमधील बालकांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीचा आनंदोत्सव अत्यंत उत्साहात व भावनांनी साजरा करण्यात आला.

विवेकानंद विद्यालय, यवतमाळ येथील माजी विद्यार्थी तसेच सामाजिक जाण असलेल्या व्यक्तींच्या वतीने या बालकांना नव्याने कपडे घेऊन देण्यात आले. सोबतच त्यांना दिवाळीचा फराळ व फटाकेही देण्यात येणार आहेत.

या वर्षी बालकांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे कपडे निवडण्याचा अनुभव मिळावा म्हणून त्यांना थेट ट्रेंड्स फॅशन मॉल, यवतमाळ येथे नेण्यात आले.
पहिल्यांदाच मॉलमध्ये प्रवेश करताना बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले कौतुक, चमक आणि आनंद पाहून उपस्थित सर्वजण भावुक झाले. अनेक बालकांनी यापूर्वी कधीही मॉल पाहिलेला नव्हता. या क्षणी त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले — कारण हा त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव होता.

बालकांनी मनसोक्तपणे स्वतःच्या आवडीचे कपडे निवडले, एकमेकांना दाखवले, आणि या क्षणाचा आनंद लुटला.
हा प्रसंग पाहताना अनेकांच्या डोळ्यांतही समाधानाचे अश्रू दाटले.
कार्यक्रमानंतर सर्व बालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीचा फराळ, गप्पा, हशा आणि आनंदाच्या या क्षणांनी त्यांचा दिवस उजळला.

या उपक्रमाची माहिती मिळताच यवतमाळ येथील उपविभागीय अधिकारी श्री. गोपाळ देशपांडे यांनीही सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर आदर्श घालून दिला.
त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस अवास्तव खर्च न करता, त्या निमित्ताने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करून सहभाग नोंदविला. त्यांच्या या कृतीने समाजातील संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.

या उपक्रमाचे समन्वयक म्हणून अनिल गायकवाड आणि अमित शिरभाते यांनी यवतमाळ येथे जबाबदारीपूर्वक कार्य केले. त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प सातत्याने आणि यशस्वीपणे राबविला जात आहे.

विवेकानंद विद्यालयात शिक्षण घेत असताना निर्माण झालेली मैत्री आजही कायम आहे.
अनेक माजी विद्यार्थी आज मुंबई, पुणे किंवा विदेशात कार्यरत असले तरी यवतमाळ जिल्ह्याबद्दलची आपुलकी आणि सामाजिक जबाबदारीची भावना आजही तितकीच जिवंत आहे.
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर उपक्रमाची घोषणा होताच सर्वजण ताबडतोब आपापले योगदान देतात — कोणतीही औपचारिकता नाही, कोणताही दिखावा नाही — फक्त एक ध्येय :
“या दिवाळीत प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर आनंदाची उजळण आणायची.”

या उपक्रमामुळे समाजात एक सुंदर संदेश दिला गेला आहे — खरा उत्सव तोच, जो दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची ज्योत पेटवतो.

यवतमाळमधील विवेकानंद विद्यालय माजी विद्यार्थ्यांच्या या कार्यातून सामाजिक संवेदनशीलता, एकात्मता आणि मानवी मूल्यांची नवी परंपरा रुजताना दिसते आहे.
सदर प्रकल्प यशस्वीतेसाठी बालकल्याण समिती यवतमाळ ची विशेष मदत व सहकार्य होते.