Home सोलापुर शाळेत जात नाही म्हणून आईने चिमुकल्या मुलिस मारून टाकले ,

शाळेत जात नाही म्हणून आईने चिमुकल्या मुलिस मारून टाकले ,

475

 

अमीन शाह ,

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या केली आहे. या महिलेने तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच संताप व्यक्त केला जात आहे. चिमुरड्या लेकीची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने सारेच हळहळले आहेत.

सावत्र आईला पोलिसांनी अटक केली आहे

मुलगी जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून या सावत्र आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती नागेश कोकणे असे हत्या झालेल्या तीन वर्षीय दुर्दैवी मुलीचं नाव आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे हिला अटक केली आहे.

सावत्र आईकडून दोन मुलींचा छळ

नागेश कोकणे हे त्यांची दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती आणि आकृती, यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथे भाड्याच्या घरात राहत होते. काही महिन्यांपासून सावत्र आई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती. जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रागाच्या भरात चिमुकलीचा गळा दाबून हत्या

शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास याच रागाच्या भरात तेजस्विनी कोकणे या महिलेने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली. या गंभीर प्रकरणात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वडवळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.