Home यवतमाळ जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नेहरू स्टेडियम, यवतमाळ येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित...

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नेहरू स्टेडियम, यवतमाळ येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होत योग साधना केली. तसेच उपस्थित सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

117

यवतमाळ – भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्र संघात (UN) 21 जूनला जागतिक योग दिन घोषित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 200 पेक्षा अधिक देशात आज योग दिन साजरा करण्यात येत आहे. हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण सांस्कृतिक परंपरेसाठीही गौरवाचा क्षण आहे.

योग हा आपल्या भारताचा प्राचीन वारसा आहे. योगामुळे आपले शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते, संयम, सहनशीलता आणि आनंदाचा भाव वाढवते. मी स्वतः देखील नियमित योगाभ्यास करतो, मला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. त्यामुळे उपस्थित सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण देखील नियमित योगाभ्यास सुरू करावा.

हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी विकसित केलेली योग ही प्राचीन आणि समृद्ध परंपरा आज संपूर्ण जगात पसरली आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्येसुद्धा लोक नियमित योगाभ्यास करतात.

आजच्या काळातील योगाचे महत्त्व फार मोठे आहे
आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव, अपुरी झोप, चुकीच्या आहारामुळे होणारे आजार हे सामान्य झाले आहेत अशा काळात योग एक प्रभावी उपायमंत्र ठरू शकतो.

भगवद्गीतेतील सूत्राप्रमाणे, योगाने कर्मात कुशलता आणि आयुष्यात समत्व निर्माण होते. म्हणून युवा पिढीने, विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनीच योगाभ्यास सुरू करणे ही काळाची गरज आहे, योगाच्या माध्यमातून आपण एक आरोग्यदायी, सकारात्मक आणि सशक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प करूया.

आज शासनाच्या वतीने योगाच्या प्रचार, प्रसारासाठी अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व नगर परिषद यांच्यामार्फत योग शिबिरे, जनजागृती अभियान, प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत. यात सहभागी व्हा, फक्त कार्यक्रमापुरते नाही. तर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून योगाचा स्वीकार करा, त्याला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा.