
महामार्ग पोलिसांची धडक कारवाई ; आयशर वाहनासह मुद्देमाल ताब्यात
फुलचंद भगत
वाशिम:-समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३१ लाख ५१ हजार २५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कारंजा (लाड) टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. यावेळी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांनी संशयित आयशर वाहन क्रमांक MH 40 CT 2964 थांबवून तपासणी केली. वाहनातून गोडसर वास येत असल्याने चालकाकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी वाहनामध्ये तंबाखूसदृश्य पदार्थ असून तो अमरावती येथील जावेद नामक व्यक्तीचा असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पोलिस उपनिरिक्षक कृष्ण कन्हैया पवार यांनी तात्काळ ही माहिती महामार्ग पोलीस विभाग वाशिमचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार दांदडे यांना दिली. दांदडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सदर वाहन कारंजा शहर पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत वाहनातील माल हा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर पोलिस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार यांच्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नितीनकुमार दांदडे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णकन्हैया पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले व पोलीस कॉन्स्टेबल आनंद काकडे यांनी पार पाडली.












































