
यवतमाळ – सार्वत्रिक नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरात राजकीय वातावरण तापले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका जितेंद्र मोघे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी माजी आमदार कीर्ती बाबू गांधी, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रफुल मानकर, किरणताई मोघे, संतोष बोरले, जितेंद्र मोघे, बबलू उर्फ अनिल देशमुख यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहर विकासासाठी सक्षम उमेदवार काँग्रेस ने दावा केला असून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, प्रियंका मोघे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट धोरण घेऊन पुढे येत आहेत. महिला सबलीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वाहतूक सुविधा सुधारणा आणि नागरिक-केंद्रित प्रशासन हे त्यांचे प्राधान्य असून थेट नागरिक संवादातून पारदर्शक व उत्तरदायी व्यवस्था उभारण्याची त्यांची भूमिका आहे.
प्रियंका मोघे या माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून असल्याने प्रशासनिक अनुभव आणि नियोजनाची परंपरा लाभली असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी नमूद केले.
यवतमाळ शहरातील 52 जागांवर काँग्रेसने स्वतःचे उमेदवार जाहीर केले असून 05 मित्रपक्षांच्या उमेदवारांसह एकूण 57 उमेदवारांसह स्वबळावर लढतीला उतरणार असल्याची माहिती देण्यात आली.
भाजप वर नगरपरिषद प्रशासनासंदर्भात गंभीर आरोप करीत या वेळी बोलताना आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सध्याच्या नगरपरिषद प्रशासनावर टीका करताना गुंड प्रवृत्तीला आश्रय, ठेकेदारांच्या माध्यमातून कामकाज, खोट्या बिलांचे व्यवहार, तसेच शहरात दारू वितरणासाठी मोठ्या प्रमाणावर NOC वाटप झाल्याचे आरोप केले.
शहरातील अवैध व्यवसाय जुगार, मटका, भिंगरी यांना काही घटकांकडून समर्थन असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“एकदा आम्हाला संधी दिल्यास स्वच्छ, सुरक्षित व सुंदर शहर उभारण्याचे काम गतीने करू,” असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
माजी आमदार कीर्ती गांधी यांनी शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताना एकाच रस्त्यावर पुन:पुन्हा डांबरीकरण करून निधीची मोठी लाट करण्यात आल्याचा आरोप केला.
शहरात ड्रग्सची वाढती समस्या गंभीर असल्याचे सांगत तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“जनतेकडे मताचा अधिकार आहे.त्याचा सुजाण वापर करून शहराला सक्षम, सुशिक्षित नेतृत्व द्यावे,” असे गांधी यांनी आवाहन केले.यावेळी सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजय कुमार बुंदेला यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी मानले.











































