Home यवतमाळ घाटंजी न. प. निवडणुकीची तयारी, सरसावले कारभारी….!

घाटंजी न. प. निवडणुकीची तयारी, सरसावले कारभारी….!

258

इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन रामराम

राजू चव्हाण
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – राज्यनिवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखा जाहीर होताच मतदारराजाच्या घरी जाऊन भेटीगाठी आणि मी कसा सक्षम उमेदवार हे सांगत घाटंजी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी करण्यात कारभारी सरसावल्याचे चित्र निर्माण झाल्याने निवडणुका आल्यात वाटते? असा मिश्किल टोला मतदार लगावतांना दिसत आहे.
दिनांक १० नोव्हेंबर सोमवारपासून नामनिर्देशन भरण्यास सुरवात होत असलेल्या घाटंजी नगर परिषदेची निवडणूक यावेळेस चांगलीच अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेत्यांची राजकारणात प्रतिष्ठा लागली असल्याने घाटंजी शहरातील वार्डा वार्डात तगडी लढत रंगणार असून राजकिय वातावरण आतापासूनच तापल्याचे दिसून येत आहे. सत्तेचे गणित सोडवितांना उमेदवारीचा प्रश्न्न जटील होणार नाही याची काळजी आप आपल्या पक्षाकडून घेतल्या जात असल्याचे पाहण्यात येत आहे. या निवडणुकीची रणधुमाळीत प्रचाराचा धडाका इच्छुकांनी लावला आहे. कडक इस्त्री केलेले कपडे घालून नेते, हौसे गवसे इच्छुक उमेदवार नमस्कार, रामराम ठोकून वार्डा वार्डात मिरवू लागले आहेत.
नगर परिषदेची निवडणूक म्हटलं की, वार्डात कुठे फाईट तर कुठे वातावरण टाईट अशी स्थिती निर्माण होते. नेत्यासाठी नगर परिषदेची निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठाची समजली जाते. आता तर राजकिय पक्षांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषदेची निवडणूक चूरशीची होणार हे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत अनेकांनी जातीय समीकरणे जोडण्यास सुरुवात केले असले तरी मागील निवडणुकांचा विचार केला तर जातीय समीकरणावर ही निवडणूक नसल्याचे दिसून येते. वरिल पातळीवर महायुती व महाविकास आघाडी असून यात राष्ट्रीय पक्षांचा समावेष आहे. मात्र घाटंजी नगर परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविणार असे जाहीर केले नसल्याने आपापल्या उमेदवरांची चाचपणी करीत असल्याने प्रत्येक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे सध्या घाटंजीत चौरंगी लढत होणार असे संकेत दिसून येत आहे.यापूर्वी नगर परिषद सदस्य संख्या १७ होती. यावेळेस हिच संख्या २० वर झाली आहे. मागील पंचवार्षिक मध्ये माजी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या आघाडीची सत्ता होती. त्यांच्या विदर्भ विकास आघाडीची उमेदवार चाचपणीची गोपनीयतात असली तरी ईतर पक्षाचे उमेदवार जाहीर होताच ते आपले पत्ते ओपन करून निवडणुकीत रंगत चढवणार आहे.असे जाणकार मंडळी कडून बोलल्या जात आहे. भारतीय जनता पार्टी कडून गजेंद्र ढवळे हे नांव चर्चेत असतांनाच सामाजिक कार्यकर्ते महेश पवार हे नांव पुढे आले आहे. याच सोबत काँग्रेस पक्षातून परेश कारिया यांचे नांव सुरू असतांनाच खासदार महोदया यांच्या जवळचे मानले जाणारे निखिल देठे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यात नेमकी उमेदवारी कोणाला मिळेल हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.वंचित कडून सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढवीण्याचा नारा दिला आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असेल हे अजून गुलदस्त्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (एसपी) हे काय भुमिका घेतात याकडे सुद्धा घाटंजीकरांच्या नजरा लागल्या आहे. या रंणधुमाळीत काही ईच्छुक बाशिंग बांधून असून अपक्ष उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावणार असल्याचे बोलले जात असले तरी खरी लढत ही राजकिय पक्ष व विदर्भ विकास आघाडीतच होणार असल्याचे जाणकार मंडळी बोलत आहे. यामध्ये आज सुरू झालेल्या नामनिर्देशन मध्ये कोण नामांकन दाखल करतो यावर विषबून आहे.साऱ्या बाबी असल्या तरी घाटंजीकर मतदार कोणाकडे सत्ता देऊन कोणाला खुर्चीवर विराजमान करणार हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे.