Home यवतमाळ काँग्रेसमध्ये उफाळली फुट! माजी आमदार वामनराव कासावार यांना डावलून ‘वेगळी चुल’ मांडणाऱ्या...

काँग्रेसमध्ये उफाळली फुट! माजी आमदार वामनराव कासावार यांना डावलून ‘वेगळी चुल’ मांडणाऱ्या गटामुळे गोंधळ

556
प्रतिनिधी
वणी:- काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पक्षातील गटबाजी आता उघडपणे दिसून येत आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधीलच एक गट ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव कासावार यांना डावलून वेगळे राजकारण करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अलीकडेच कासावार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे घटक पक्ष — शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि इतर सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
मात्र, काँग्रेसमधीलच एका गटाने या बैठकीपासून स्वतःला अलिप्त ठेवत, स्वतंत्रपणे काँग्रेस गट म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गट प्रत्यक्षात काँग्रेसचे नाव वापरत असला, तरी ‘वेगळी चुल’ मांडून वामनराव कासावार यांना बाजूला ठेवत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, हा गट विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीसोबत न जाता अपक्ष म्हणून मैदानात उतरला होता. त्यावेळी या गटाला डिपॉझिटही वाचवता आले नव्हते. तरीही आता त्याच गटाने पुन्हा आघाडीला वळसा घालून महाविकास मध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने उमेदवारीचा मार्ग स्वीकारल्याने काँग्रेसच्या संघटनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकसभेत व विधानसभेत प्रामाणिकपणे माजी आमदार वामनराव कासावार हे महाविकास आघाडी सोबत होते व त्यांच्या पुढारात वणी विधानसभा क्षेत्रात संपन्न झालेल्या निवडणुकीत महाविकासआघाडी ही आघाडीवरच होती. लोकसभेत विजय आणि विधानसभेतही विजय मिळाला असे असतानाही काही लोक मात्र त्या महत्व कमी करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बघत असल्याने काँग्रेस पार्टीत चांगलीच चलबिचल उडाली आहे.
स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या गटबाजीबद्दल तीव्र नाराजी असून, यामुळे भाजप व इतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
पक्षातीलच अशी अंतर्गत धुसफूस कायम राहिली, तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार, अशी भीती व्यक्त होत आहे.