Home यवतमाळ सुरुंग हा काव्यसंग्रह नव्या पिढच्या दिग्दर्शनाचे काम करेल – प्रा. अंकुश वाकडे

सुरुंग हा काव्यसंग्रह नव्या पिढच्या दिग्दर्शनाचे काम करेल – प्रा. अंकुश वाकडे

192

अलीकडच्या वैचारिक संभ्रम असलेल्या आणि दर्जेदार साहित्याची निर्मिती मंदावल्याच्या काळात सुरुंग हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे हा काव्यसंग्रह अत्यंत दर्जेदार स्वरूपाचा असून यातील प्रत्येक कविता ही क्रांतीचे बीज घेऊन उगवली आहे येणाऱ्या नव्या पिढीचे वैचारिक दिग्दर्शन करण्याची क्षमता या काव्यसंग्रहात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रा अंकुश वाकडे यांनी केले.

रविवार दिनांक १२नोव्हेंबर २०२५ला स्मृतीशेष वेणूताई हरिशकुमार भवरे यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथील शिव महाविद्यालयाच्या प्रशस्त दालनात सुरुंग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले. या प्रकाशन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कवी हरीश कुमार भवरे यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी कवितासंग्रह प्रकाशित करावा ही फारच भूषणावह बाब आहे. भवरे सरांची कविता अनुभवाने संपन्न आहे ती चपलखपणे तत्त्वज्ञान सांगून जाते. आंबेडकरी चळवळीचा चढ उतार पाहिलेल्या कवीने या काव्यसंग्रहाद्वारे लोक जागृती करण्याचे मौलिक काम होणार असल्याची भावना प्रा वाकडे यांनी व्यक्त केली.
यावेळी उमरखेड येथील मराठी विभागाचे प्रोफेसर डॉ. अनिल काळबांडे यांनी या कवितेवर सखोल भाष्य केले. मराठी साहित्यात समकालीन कवितेमध्ये भवरे सरांची कविता वेगळे आयाम घेऊन आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. दिलीप घावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शीव महाविद्यालयाचे प्राचार्य चंदन काळे यांच्याहस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन झाले तर अध्यक्ष स्थानी इंजि. मनोहर शहारे होते. या संग्रहाची निर्मिती हेमंतकुमार कांबळे यांच्या श्रावस्ती प्रकाशन संस्थेने केली.या कार्यक्रमाचे संचालन युवा कार्यकर्ते सुरज खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील खरतडे यांनी केले