कृषी विभागाची उपस्थिती
केवळ कागदावर
ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी
चंद्रपूर कृषी प्रधान देश म्हणून भारताची ओळख असली तरी प्रत्यक्ष शेतकरी मात्र धान लागवडीनंतर गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत.ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी सध्या धान शेतीत गुंतलेले असताना त्यांना तांत्रिक मार्गदर्शनाचा गंभीर अभाव जाणवत आहे. कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे, रोगनिदान करणे किंवा उपाययोजना सुचवणे हे काम पूर्णपणे थांबले आहे.
धानाला तांबेरा, करपा, पानगळी रोग तसेच कीड व अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. परंतु या समस्येवर योग्य वेळी उपाय न केल्यास उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. शेतकरी स्वतःच्या अनुभवावर किंवा कृषी केंद्रातील विक्रेत्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्यास भाग पडत आहेत. यामुळे चुकीची औषधं किंवा खतं वापरण्याचे प्रमाण वाढले असून, खर्च वाढत असताना उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी सहाय्यक व कृषी सेवक केवळ नोंदी भरण्यापुरते मर्यादित असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करीत नाहीत. विविध शासकीय योजना, पीकविमा, तसेच रोगनिदान शिबिरांचे आयोजन केवळ दाखवायचे म्हणून केले जात असून प्रत्यक्ष परिणामकारक ठरत नाहीत.
स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, धान हंगामात तातडीने रोगनिदान शिबिरे आयोजित करावीत, शेतशिवार भेटी घ्याव्यात व शेतकऱ्यांना योग्य औषधोपचार, खत व्यवस्थापन व कीडनियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन द्यावे.
शेतकऱ्यांच्या हितार्थ जर योग्यवेळी कृषी विभागाने पावले उचलली नाहीत, तर या वर्षी धान उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post Views: 148