
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती
यवतमाळ : महाराष्ट्रातील बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
या शिष्यवृत्तीकरीता नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट आहे. किमान १२ उत्तीर्ण विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीकरीता १०० गुणांची पूर्व परीक्षा होणार आहे. त्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य अध्ययन, गणित आणि बुद्धीमत्ता चाचणी या पाच विषयांवर प्रत्येकी २० गुणांचे प्रश्न राहणार आहेत. परीक्षेची तारीख, केंद्र आणि वेळ नोंदणी केलेल्या उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. विद्यार्थ्यांची निवड ऑफलाईन स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबत, मोफत ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास साहित्य देखील पुरवल्या जातील. या शिष्यवृत्ती योजनेत बंजारा समाजातील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून ही शिष्यवृत्ती योजना सुरू असून, या योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची आतापर्यंत शासकीय सेवेत विविध पदांवर नियुक्ती झाली आहे.
या योजनेच्या अधिक माहितीकरिता विदर्भ IAS अकॅडमी, अमरावती किंवा या नंबर वर 8530370674, 9067580048, 8668920552 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











































