Home यवतमाळ सामान्यासाठी लढणारा योध्दा – रजनीकांत बोरेले

सामान्यासाठी लढणारा योध्दा – रजनीकांत बोरेले

86

यवतमाळ – समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, सत्यासाठी लढणारे, आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे रजनीकांत डालूरामजी बोरेले हे नाव महाराष्ट्रातील पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथे परिचित आहे. व्हिसल ब्लोअर, आर.टी.आय. कार्यकर्ते, आणि जिंदल पुरस्कार विजेते या नात्याने त्यांनी लोकहितासाठी निस्वार्थ सेवा दिली आहे. त्यांच्या या विधायक कार्यामुळे त्यांना “वन मॅन आर्मी” म्हणूनही ओळखले जाते.

सामाजिक योगदानाचे व्रत

रजनीकांत बोरेले यांनी गरीब व अनाथ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, शालेय साहित्य, सायकली, कपडे, आणि जेवणासाठी डबे वाटप केले आहे. अनेक गरीब मुलींना लग्नासाठी आर्थिक साहाय्य, तसेच दरमहा वृद्धांना १,५०० ते २,००० रुपयांचे राशन आणि जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. अपघातग्रस्त व रुग्णांना मदत, अंतिमसंस्कारासाठी मदत, तसेच धार्मिक कार्यक्रमांतही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील लढा

रजनीकांत बोरेले यांनी अनेक सरकारी विभागांतील भ्रष्टाचाराचे भांडाफोड केले आहे. त्यांनी पोलीस, महसूल, आणि विविध प्रशासनिक विभागांतील गैरव्यवहारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांच्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. या संघर्षामुळे त्यांना अनेकदा जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांच्यावर हल्ले आणि धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना अद्याप झालेली नाही.

विशेष पुरस्कार आणि गौरव

सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी २०१२ साली जिंदल पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, अण्णा हजारे, संतोष हेगडे, आणि श्री श्री रविशंकरजी यांच्यासारख्या नामवंत व्यक्तींसोबतच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

सरकारकडून अपेक्षा

सरकारने रजनीकांत बोरेले यांना योग्य सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या कार्याला मान्यता द्यावी. अशा लढवय्या कार्यकर्त्यांचा आदर आणि पाठिंबा मिळणे हे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. समाजात सत्य आणि न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे.