Home जालना शाळांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ बद्दल जनजागृती अभियान राबवावे-ॲड. अश्विनी धन्नावत

शाळांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ बद्दल जनजागृती अभियान राबवावे-ॲड. अश्विनी धन्नावत

34

इन्नरव्हील होरायझनतर्फे पिरपिंपळगाव शाळेत शालेय साहित्य वाटप

जालना/लक्ष्मण बिलोरे

-लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमुळे शाळांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींची पालकांना चिंता असते. अशावेळी पालक आणि शाळांनी मुलांच्या सुरक्षेसाठी काही खास पाऊले उचलायची गरज आहे. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाची सुरुवात वाईट हेतूने केल्या जाणाऱ्या स्पर्शाने होते. जर आपण मुला-मुलींना गुड टच, बॅड टच अर्थात चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक समजून सांगितला किंवा त्याबाबत शिकवण दिली तर अशा घटना रोखता येऊ शकतात. त्यासाठी शाळांमध्ये गुड टच, बॅड टच अभियान प्राधान्याने राबविले जावे, असे प्रतिपादन इन्नरव्हील ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्ष ॲड. अश्विनी धन्नावत यांनी येथे केले.
इन्नरव्हील ऑफ जालना होरायझनच्यावतीने जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय सेमी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके, कंपास, रंगपेटी, वर्षभरातील शैक्षणिक प्रगती, चांगली उपस्थिती, खेळात निपुण अशा २५ विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून क्लबच्या सदस्य प्रज्युषणा यांच्यावतीने स्कूल बॅग वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यात वाचनाची गोडी वाढविण्यासाठी गोष्टीची आणि क्रमिक पुस्तके, जगाचा नकाशा, नकाशाचा संच देऊन लायब्ररीचे सेटअप करून देण्यात आले. तसेच महिला शिक्षिका आणि शाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅडला मेनस्ट्रोल कप मोफत उपलब्ध करून देण्यात आले. ती वापरायला किती सोपे आहे, कसा वापर करायचा आणि ते आरोग्य व पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ॲड. धन्नावत यांनी मुला-मुलींना गुड टच, बॅड टच कसा ओळखावा यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल कुरकुटे हे होते. व्यासपीठावर क्लबच्या सचिव ॲड. पिंकी लड्डा, सदस्य अमृता मिश्रीकोटकर, शोभा इंगळे, पुनम खंडेलवाल, प्रज्यूषणा रुणवाल यांची उपस्थिती होती. ॲड. धन्नावत पुढे म्हणाल्या की, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ही संकल्पना नवीन असली तरी, याची मुला- मुलींना पालक आणि शिक्षकांनी जाणीव करून देण्याची गरज आहे. लैंगिक छळ सहसा नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून होत असतो. अनोळखी व्यक्तीपेक्षा ओळखीचे व्यक्ती एकवेळ जास्त धोकादायक असतात. अशावेळी घाबरून न जाता पटकन कोणालातरी सांगा, त्या ठिकाणाहून पळ काढा आणि तात्काळ आपल्या आई-वडिल आणि शिक्षकांना सांगावे. हा छळ सहन करायचा नाही, चूप बसायचे नाही. अशाप्रसंगी पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०८९८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.