Home मुंबई सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या ,

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या ,

191

 

 

अमीन शाह

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.

चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले. १९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं कला दिग्दर्शन त्यांनी केले होते.

वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला आहे, तर तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.