Home यवतमाळ घाटंजी तालुक्यात भुदान यज्ञ मंडळाची एकच शेतजमीन पारवा येथे दोघांना वाटप..!

घाटंजी तालुक्यात भुदान यज्ञ मंडळाची एकच शेतजमीन पारवा येथे दोघांना वाटप..!

106

➡️ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशीची मागणी..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : भुदान यज्ञ मंडळ यवतमाळ – नागपूर, भुदान यज्ञ मंडळाचा एकच पट्टा घाटंजी तालुक्यातील पारवा येथील दोघांना वाटप केल्याने नवा वाद उपस्थित होऊन सदर प्रकरण यवतमाळच्या दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) डी. एस. थोरात यांच्या न्यायालयात पोहचला आहे.

सदर प्रकरणात वादी नामदेव बापू सपाटे यांनी प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार घाटंजी, भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार, भुदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष व आकाश सुभाष ठमके विरुद्ध दावा दाखल करुन घोषणेच्या, कायम मनाई हुकूमाचा व मॅन्डेटरी मनाई हुकुमाकरीता दावा दाखल करण्यात आला आहे.

घाटंजीचे तत्कालीन तहसीलदार यांनी पारवा येथील नामदेव सपाटे यांच्या नावाने 11 फेब्रुवारी 1967 रोजी भुदान पट्टा 330 भुदान यज्ञ विदर्भ विभाग नागपूरचे मंत्री पी. जी. शेंदुर्णीकर यांच्या सहीनिशी देण्यात आला होता. सदर पट्ट्यानुसार पारवा येथील गट नंबर 81 जुना सर्वे नंबर 201/2 क्षेत्रफळ 1 हेक्टर 28 आर ही शेतजमिन वादी नामदेव सपाटे यांच्या ताब्यात व वहीतीत असतांना भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार व इतरांनी मोठ्ठी उलाढाल करुन (लाखो रुपये घेऊन) तिच गट नंबर 81 ही शेतजमीन भुदान पट्टा क्रमांक 1077/2022 दिनांक 30 जुलै 2022 रोजी पारवा येथील प्रतिवादी आकाश ठमके यांना चुकीच्या मार्गाने बेकायदेशीर रित्या पुन्हा देण्यात आला.

त्या नुसार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार व इतरांनी तहसीलदार घाटंजी यांना तसे पत्र दिले. त्या आधारे शेताच्या महसुली दफ्तरी 874 क्रमांकाचा फेरफार नोंदविण्यात आला. तसेच प्रतिवादी आकाश ठमके याच्या नावाने सदर शेतजमीनीची नोंद करण्यात आली. वास्तविक पाहता, एकदा दिलेला पट्टा दुसरयाला नियमानुसार देता येत नाही. परंतु भुदान पट्टाच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन नियमबाह्य पट्टे देने सुरू आहे. विशेष म्हणजे भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार हे मध्यंतरीच्या काळात सचिव पदावर नसतांना नियमबाह्य भुदान पट्टे वाटप करुन शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे.

तसेच सचिव पदावरील वाद सदर स्थगिती प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. त्यामुळे सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार घाटंजी, यांना प्रतिवादी करण्यात आले.

विशेष म्हणजे पारवा येथील खंड 1 मधील गट नंबर 81 जुना सर्वे नंबर 201/2 मधील 1 हेक्टर 28 आर भोगवटवर्ग 2 प्रतिवादी आकाश ठमके यांचा भुदान पट्टा रद्द करुन जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार घाटंजी, भुदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार, प्रतिवादी आकाश ठमके यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वादी नामदेव सपाटे यांनी यवतमाळच्या दिवाणी न्यायालयात केली आहे.

दरम्यान, घाटंजी तालुक्यातील चोरंबा, मुर्ली, पांढुर्णा व इतर अनेक ठिकाणी या पुर्वी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा भुदान यज्ञ मंडळाचे वादग्रस्त सचिव एकनाथ डगवार व पांढुर्णा येथील वादग्रस्त सदस्य यांनी लाखों रुपये घेऊन भुदान पट्टे वाटप केले आहे. सदर प्रकरणात पांढुर्णा येथील एका संस्थेचा पदाधिकारी सदस्य याचाही सहभाग असुन सदर प्रकरणात भुदान यज्ञ मंडळाचे सचिव व सदस्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी नामदेव सपाटे यांनी शासनाकडे केली आहे.