Home यवतमाळ “45′ अंशांचा पारा, तरीही रक्तदानासाठी रांगा….!

“45′ अंशांचा पारा, तरीही रक्तदानासाठी रांगा….!

111

शिवसेनेच्या पुढाकारात ३५४ दात्यांचे ‘महारक्तदान’

यवतमाळ : एकीकडे उन्हाचा पारा ४५ अंशांच्या पार गेलेला असताना, दुसरीकडे यवतमाळच्या तरुणाईने आणि शिवसैनिकांनी सामाजिक संवेदनेचा ओलावा जपला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ३५४ नागरिकांनी रक्तदान करून दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण केला.

उन्हाळ्यात रक्ताचा होणारा तुटवडा ही एक मोठी समस्या असते. थॅलेसेमियाचे रुग्ण, अपघातग्रस्त आणि गंभीर शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना रक्तासाठी वणवण करावी लागू नये, या उद्देशाने ना. संजय राठोड यांनी १५ वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. यंदा या स्तुत्य उपक्रमाचे १६ वे वर्ष असून, प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्याने आपली साथ कायम ठेवली आहे. केवळ उद्घाटन करून न थांबता, ना. संजय राठोड यांनी, ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असल्याचे सांगत, या कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुणाचे कौतुक केले.
उष्णतेची लाट असतानाही जिल्ह्यातील तरुण, महिला आणि शिवसैनिकांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली होती. एकाच दिवसात ३५४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला शिवसेनेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी
उईके, पश्चिम विदर्भ सह संपर्कप्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, गजानन डोमाळे, राजुदास जाधव आणि जिल्हा समन्वयक संजय हातगावकर,
आदिवासी आघाडी संपर्क प्रमुख सुरेश चिंचोळकर, युवासेना लोकसभा संपर्क प्रमुख विशाल गणात्रा, लोकसभा अध्यक्ष नंदकिशोर ठाकरे, युवासेना जिल्हा प्रमुख आकाश राठोड, महेश पवार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जोती वाघाडे रुग्ण सेवक विकास क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि आदींनी परिश्रम घेतले. राजकारणापलीकडे जाऊन ना. संजय राठोड यांनी जोपासलेले हे समाजकार्य आज अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असल्याची भावना यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.