Home बुलडाणा संभाजी ब्रिगेड घेणार जिल्हाभरातील विमा कार्यालयांचा ताबा ,

संभाजी ब्रिगेड घेणार जिल्हाभरातील विमा कार्यालयांचा ताबा ,

198

 

प्रलंबित पिकविम्यांसाठी शेतकरी नेते पांडुरंग पाटील आक्रमक

प्रा दिलीप नाईकवाड बुलढाणा

सन २०२३-२०२४ खरीप व रब्बी तसेच २०२४-२५ मधील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे नैसर्गिक अतिवृष्टी मुळे जिल्हाभर प्रचंड नुकसान झाले होते. परंतु 2023-2024 या वर्षातील पिक विमा अनेक शेतकऱ्यांचे जमा होण्याचे बाकी आहेत. त्याचबरोबर 2024-25 मधील रब्बी हंगामातील कांदा पिकाचे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत सर्वे होऊनही आजपर्यंत सदर शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही. यासंबंधी विचारणा केली असता जिल्हा विमा प्रतिनिधींकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी धडक देत जिल्हा अधीक्षक यांच्या मार्फत विमा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी यांचेकडे सदर तीनही वर्षातील शेतकऱ्यांच्या एकूण प्राप्त तक्रारी व आजवर वितरित करण्यात आलेले पिक विम्याची एकूण यादी निवेदनाद्वारे मागवण्यात आली.तसेच लवकरात लवकर कंपनीकडून सदर माहिती प्राप्त न झाल्यास प्रलंबित विम्यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनाद्वारे विमा कंपनीची जिल्ह्यातील सर्व कार्यालये संभाजी ब्रिगेडकडून ताब्यात घेण्यात येतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. याचबरोबर पाटील यांनी आजवर प्रलंबित पिक विमा यासाठी कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा अधीक्षक डाबरे यांना जाब विचारला. शेतकऱ्यांच्या विम्या सोबतच इतर मागण्यांसाठी यापूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे दालना बाहेर शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या रक्तदान आंदोलनाची आठवण करून देत यानंतरची आंदोलने अधिक तीव्र स्वरूपाची असू शकतात असा इशारा पाटील यांचे कडून देण्यात आला.प्रसंगी लवकरच पालकमंत्री यांच्या जिल्हा दौऱ्यानिमित्त बैठकीमध्ये सदर विषय मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी पाटील यांचे समवेत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष गोपाल गरड, राहुल मेहत्रे व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.