Home यवतमाळ सत् चिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश नंदूरकर यांना ‘वंदन सन्मान’ जाहीर

सत् चिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश नंदूरकर यांना ‘वंदन सन्मान’ जाहीर

257

मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पुरस्काराचे दहावे वर्ष

यवतमाळ – येथील मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वंदन’ सन्मान यावर्षी यवतमाळ येथे गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले सत् चिकित्सा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भास्करराव नंदूरकर यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

येत्या ५ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापक संचालिका मंगलाताई शाह राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून उज्जैन येथील सेवा धाम सेवाकार्य संस्थेचे संस्थापक सुधीर गोयल उपाख्य भायजी हे राहणार आहेत.

सेवा ही प्रेमपूर्वक, निस्वार्थपणे आणि प्रसिद्धीपराड्मुख राहून अहंकारमुक्त मनाने करायला हवी, हा श्री सत्यसाईबाबा यांचा संदेश आपल्या वागण्यात, बोलण्यात, जगण्यात रूजवत डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी यवतमाळची सेवाभूमी समृद्ध केली. प्रसिद्धीपासून दूर राहून ते खऱ्या अर्थाने दीन, दुबळ्या, रंजल्या, गांजल्या मनांचे, लोकांचे कैवारी झाले. शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय, आध्यात्मिक, क्रीडा असे प्रत्येक क्षेत्र डॉ. नंदूरकर यांच्या निस्वार्थ सेवेने प्रकाशमय झाले. भूकंप, त्सुनामी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीत आपल्या सेवाकार्याची सुरूवात करून, पुढे या सेवाकार्याचा विस्तार केला.

त्यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी गेल्या ४० वर्षांपासून नारायण सेवा सुरू आहे. राज्यात सर्वप्रथम सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याची सुरूवात ३१ वर्षांपूर्वी डॉ. प्रकाश नंदूरकर यांच्या पुढाकारातून झाली. आजपर्यंत अडीच हजारांवर जोडपी या मेळाव्यात विवाह बंधनात बांधली गेली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे ते पालक झाले. याशिवाय अशा कुटुंबातील मुलांच्या शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था डॉ. नंदूरकर यांनी आपल्या संस्थेमार्फत मोफत केली. आरोग्य क्षेत्रात सातत्याने शिबिरांचे आयोजन केले. आजही त्यांच्या संस्थेमार्फत गावागावात वाहन पाठवून मोफत आरोग्य तपासणी केली जाते. यवतमाळ येथे स्वत:च्या इमारतीत ‘मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पीटल’ सुरू केले. प्रसुती पूर्व औषधोपचार व प्रसुती पश्चात महिला व तिच्या बाळाची संपूर्ण काळजी येथे नि:शुल्क घेतली जाते. अलिकडेच डोळ्यांचा दवाखानाही सुरू केला. येथेही डोळ्यांवरील अनेक महागडे उपचार मोफत होतात.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविलेल्या एक मुठ्ठी अनाजसारख्या उपक्रमातून असंख्य गरजवंत कुटुंबांना अन्नधान्याची मदत करण्यात आली. अनेक शाळेतील गरजवंत मुलांसाठी शेअर अवर स्ट्रेंथ ,ब्रेकफास्ट रेव्हॉल्युशन, अन्नपूर्णा ट्रस्ट या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने भोजनपूर्व पौष्टीक आहार हा उपक्रम डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी सुरू केला. यवतमाळच्या क्रीडा विश्वात अमूल्य योगदान देणाऱ्या नंदुरकर कुटुंबात क्रीडा क्षेत्रातील तब्बल पाच राज्य पुरस्कार आहेत.

डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी यवतमाळच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात दिलेले भरीव योगदान लक्षात घेवून मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे वंदन सन्मान निवड समितीने यावर्षीच्या दहाव्या वंदन सन्मानासाठी डॉ. प्रकाश नंदूरकर यांचे नाव निश्चित केले. यवतमाळरांनी वंदन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.