Home यवतमाळ तलाठी भरती प्रकरणाची सरकारने चौकशी करावी…!

तलाठी भरती प्रकरणाची सरकारने चौकशी करावी…!

116

पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ता अंकित नैताम यांची मागणी…! 

पांढरकवडा प्रतिनिधी

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात सरकारने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ट्रायबाल फोरम चे अंकित नैताम यांनी केली आहे.

राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. गुण ठरवण्यासाठी सामान्यीकरणाचे (नॉर्मलायझेशन) सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आले. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण आहेत. एकाला २०२.४५ तर दुसऱ्याला १९४.०६९ गुण आहेत. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. यात क्रमश: २०१.३३, १९९.८९ व १९५.२७ गुण आहेत. असाच प्रकार २०१९च्या तलाठी भरतीमध्येही घडला होता. सरकारने तपासात पुढाकार घेणे गरजेचे आहे.
तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली. मात्र, आरोप होत असताना शासन स्वत: दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करीत नाही, परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार, तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे. त्यातून तपास करावा, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष ट्रायबल फोरम अंकित नैताम यांनी केली आहे

*200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले* ?

सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

*राज्य सरकारनं काय म्हटलेय* ?

तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

*सखोल चौकशी करा*

नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते. या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष ट्रायबल फोरम अंकित नैताम यांनी केली आहे.