Home अकोला दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण …!

दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण …!

104

अमीन शाह ,

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालूक्यातल्या धामणदरी गावात गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासल्याची घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करण्यात आले. विद्यार्थींनीनी त्यांच्यावर सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची पालकांकडे वाच्यता केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. दोन्ही शिक्षकांवर बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी शिक्षक राजेश रामभाऊ तायडे आणि सुधाकर रामदास ढगे यांना अटक करण्यात आली आहे. या घटनमुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.

धामणदरीत ‘गुरू-शिष्या’च्या पवित्र नात्याला काळीमा

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात धामणदरी गाव आहे. या गावात चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक आहेत. येथे चौथ्या वर्गात शिकत असलेल्या चार विद्यार्थीनींवर त्यांच्या दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दोन्ही शिक्षक मुलींना एकटे पाहून वर्गातच अश्लिल चाळे करायचे. वारंवार घडणाऱ्या या कृत्यामुळे विद्यार्थीनी भयभीत झाल्या होत्या. त्या शाळेत जायला टाळाटाळ करीत होत्या. भेदरलेल्या मुलींना त्यांच्या पालकांनी विश्वासात घेतलं. पालकांनी त्यांना शाळेत न जाण्याचं कारण विचारलं. त्या चौघींपैकी एकीने वारंवार घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. सदर प्रकार ऐकल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर तातडीने कुटुंबीयांनी बार्शिटाकळी पोलीस स्टेशन गाठलं. बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्यासमोर सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान पीडित मुलींच्या तक्रारीनंतर शिक्षक राजेश रामभाऊ तायडे (वय 45), सुधाकर रामदास ढगे (वय 53) दोघेही राहणार अकोला यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आपल्या चिमुरड्यांना शाळेत पाठवायला भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून दिली जात आहे.