Home यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यांस रेल्वेसुविधांबाबत पुनर्वैभव मिळवून देणार- हंसराज अहीर

चंद्रपूर जिल्ह्यांस रेल्वेसुविधांबाबत पुनर्वैभव मिळवून देणार- हंसराज अहीर

117

चंद्रपूर / यवतमाळ – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात विशेषतः जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी अनेक महत्वपुर्ण रेल्वे गाड्या सुरु करण्यात, अनेक रेल्वेस्टेशन थांबे मंजुर करण्यात, मुंबई- पुणेकरिता थेट गाड्यांची सुविधा उपलब्ध करवून घेण्यात यश मिळाले होते. परंतु कोरोना संकटानंतर पुन्हा लोकसभा क्षेत्र व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वे सोयी-सुविधांचा अभाव जाणवू लागल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना होत असलेला हा त्रास दुर करित जिल्ह्यात रेल्वे सुविधाबाबत पुनर्वैभव मिळवून देऊ असा ठाम निर्धार, विश्वास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात रेल्वे प्रवाश्यांना रेल्वेच्या सोयी सुविधा पूर्ववत देण्यात याव्यात, बंद केलेल्या रेल्वे गाड्या सुरु कराव्यात या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून समितीच्या शिष्टमंडळाने दि. 18 मार्च रोजी हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाला बंद झालेल्या सर्व गाड्या, आवश्यक स्टॉपेज पुन्हा मिळवून देऊ असा निर्धार अहीर यांनी या भेटीप्रसंगी बोलुन दाखविला. या मागण्यांबाबत आपण आग्रही असून थेट मुंबई व अन्य बंद असलेल्या महत्वपुर्ण गाड्या पुन्हा सुरु करवुन घेवू तसेच भद्रावती, वरोरा व अन्य ठिकाणी गाड्यांचे थांबे सुरु करु, पुणे व अन्य साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यास रेल्वेविषयक सुविधा उपलब्ध करीत चंद्रपूर जिल्ह्याला पुनर्वैभव मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी रेल्वे समितींच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केला.