Home बुलडाणा शेतकऱ्याने मागितली कुटुंबासह इच्छा मरणाची मागणी

शेतकऱ्याने मागितली कुटुंबासह इच्छा मरणाची मागणी

85

साहेब मरण द्या हो साहेब मरण शेतकऱ्याचा टाहो

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही:-कोबीला बाजारात दोन रुपये किलो भाव असल्याने वाहतुकीलाही परवडत नाही, मग उत्पादन खर्च काढायचा कुठून हा प्रश्न आ वासून उभा असताना देऊळगाव मही येथील शेतकऱ्याने भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे स्वइच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. या प्रकारामुळे तालुक्याचे प्रशासन हादरले आहे. तालुक्यातील देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे यांच्या १ एकर शेतीत त्यांनी फुलकोबी चे उत्पादन घेतले होते. पिक काढणीवर आले असताना बाजारात फुलगोबी ला दोन रुपये किलो भाव असल्याने ट्रॅक्टर मध्ये भरून गोबी बाजारात नेण्याइतपत वाहतूक खर्च निघेना असे झाले. मग उत्पादन खर्च काढायचा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने शेतातील सर्व फुलकोबी च्या पिकावर ट्रॅक्टर रोटावेटर चालवून नष्ट केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी कोबीच्या पिकात शेळ्या मेंढ्या व गुरे सोडून फुलकोबी चे पीक नष्ट केले. शेतमाला ला बाजारात कवडीमोल भाव मिळत असून हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन खर्च काढणे ही कठीण झाले आहे. त्यातच फुलगोबी या पिकाला बाजारात भावच नसल्याने बाजारापर्यंत माल वाहतूक करून नेण्याचा खर्चही निघत नसल्याने रोटावेटर ने कोबी काढून पैसा लावून तसेच शेतात घाम गाळून पिकवलेल्या पिकात शेळ्या मेंढ्या घातल्याने मानसिक दृष्ट्या खचलेल्या मधुकर शिंगणे या शेतकऱ्याने कुटुंबासह इच्छामरणाची परवानगी राष्ट्रपती यांच्याकडे मागितली आहे. तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या इच्छा मरणासाठी च्या परवानगी नंतर महसूल व पोलीस प्रशासन हादरले आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, मात्र या सरकारने शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे, शेतमालाला हमीभाव नसल्याने कापूस सोयाबीन अद्याप पर्यंत शेतकऱ्याकडे साठवलेले आहे. त्यातच भाजीपाला कवळी मुलाने विकला जात असल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे. शेतमालाला भाव मागण्यासाठी केलेल्या आंदोलकावर हे सरकार लाठी चार्ज करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून काढत आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी सरकार मायबाप समजले जाते मात्र या सरकारची शेतकऱ्यांविरुद्ध एक प्रकारची दडपशाही सुरू आहे.शेख जुल्फेकार, जिल्हा सरचिटणीस स्वाभिमानी शेतकरी संघटना देऊळगाव मही