Home महत्वाची बातमी बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँक बंद होण्याची अफवा; खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण, बँकेत...

बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँक बंद होण्याची अफवा; खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण, बँकेत मोठी गर्दी

153

*बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँक बंद होण्याची अफवा; खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण, बँकेत मोठी गर्दी*

 

नजीर शेख ,
बदनापूर (प्रतिनिधी) – बदनापूर येथील बुलढाणा अर्बन बँक सोसायटी बंद होत असल्याची अफवा गेल्या दोन दिवसांपासून शहरात व परिसरात झपाट्याने पसरत आहे. या निराधार अफवेचा फटका थेट बँकेच्या खातेदारांना बसत असून, भीतीपोटी अनेक खातेदारांनी बँकेत एकच गर्दी केली आहे.
अफवा पसरताच अनेक खातेदारांनी आपल्या बचत खात्यातील (Saving Account) रक्कम, मुदत ठेव (FD) तसेच सोनातारण (Gold Loan) खात्यांमधील रक्कम तातडीने काढून घेण्यास सुरुवात केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिणामी बँकेसमोर तसेच बँकेच्या काउंटरवर मोठी गर्दी उसळली होती.
दरम्यान, बँकेतील कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांनी वेळोवेळी खातेदारांना समज देत “बँक पूर्णपणे सुरळीत असून बंद होण्याबाबतची बातमी ही केवळ अफवा आहे. कुणीही यावर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्ट केले. तरीही अफवेचा वेग इतका प्रचंड आहे की समजावून सांगूनही अनेक खातेदार भीतीपोटी आपली संपूर्ण रक्कम काढून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही अफवा आधी इतर जिल्ह्यांमध्ये पसरली होती. त्यानंतर ती बदनापूरमध्ये पोहोचली असून, सोशल मीडियावर व तोंडी चर्चेमुळे ही अफवा अधिकच बळावत आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवेमुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे.
बँक प्रशासनाने खातेदारांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून व्यवहार सुरळीत सुरू आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही प्रशासन विचार करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण असून, खातेदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासन व बँक व्यवस्थापनाने एकत्रितपणे या अफवांवर आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया – बदनापूर तालुक्यातील बँक ग्राहकांनी, खातेदारांनी घाबरण्याचे काही कारण नाही, कोणीतरी ही अफवा पसरवली असून ज्यांना बँकेशी व्यवहार करायचे आहे ते रात्री 1 वाजेपर्यंत करू शकतात बँक सुरू राहणार आहे – संचालक गजानन गीते, बदनापूर शाखा.
— *बदनापूर प्रतिनिधी : नजीर शेख.