
वर्धा जिल्ह्यातील शांततेसाठी प्रसिद्ध असलेला आर्वी तालुका सध्या अवैध व्यवसायांच्या विळख्यात सापडल्याची चर्चा जोरात आहे. दारू, जुगार, सट्टा, वाळू तस्करी यांसारखे अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असून, त्यावर पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी पोलिसांच्या “मूक संमती”नेच हे धंदे चालत असल्याचा आरोप आहे. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे.
आर्वी पोलीस ठाण्यातील डी.बी. पथक (Detection Branch) गुन्हेगारी रोखण्यात पूर्णपणे निष्क्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. गुन्हे उघड करण्याऐवजी केवळ कागदोपत्री कारवाई करून खरे आरोपी मोकाट फिरत आहेत, अशीही स्थानिकांची तक्रार आहे.
गावोगावी सुरु असलेले सट्टे, बेकायदेशीर मद्यविक्री, तसेच वाळू तस्करीमुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा होत आहे. याशिवाय तरुण पिढी या अवैध व्यवसायांच्या विळख्यात अडकत असून सामाजिक वातावरण बिघडत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.











































