Home मराठवाडा गरोदर महिलेवर तिघांनी घरात घुसून केला अत्याचार गरोदर मातेची गळफास घेऊन आत्महत्या

गरोदर महिलेवर तिघांनी घरात घुसून केला अत्याचार गरोदर मातेची गळफास घेऊन आत्महत्या

159

सर्वत्र सांतापाची लाट…!

अमीन शाह

हिंगोली , दि. १४ :- हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात असलेल्या साखरा येथील २८ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. गावातीलच तिघा जणांनी घरात घुसून तिच्यावर शारीरिक अत्याचार करीत व्हिडिओ चित्रीकरण केल्याचे धक्कादायक वास्तव यानंतर समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहीली. चित्रीकरण लोकांना दाखवून माझी बदनामी केली. शिवाय त्यांच्याबरोबर संबंध ठेवण्यास भाग पाडले असे या चिठ्ठीत नमूद केलंय. पुन्हा कुणी असं गैर कृत्य करू नये म्हणून त्या तिघा दोषींना शिक्षा द्या, असं आत्महत्येपूर्वी पीडितेने लिहलेल्या चिठ्ठीमुळे एकच खळबळ माजली आहे.

दोन महिन्याच्या गरोदर असलेल्या महिलेवर बलात्कार करून त्याच व्हिडीओ चित्रीकरण करण्याचा प्रकार २०१५ साली घडला होता. या घटनेने व्यतिथ झालेल्या पीडितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्यानंतर लिहिलेल्या सुसाईड नोट मधून हा प्रकार उघडकीस आला.

चिठ्ठीत काय लिहिलं ?

मृत्यूपूर्वी मी ही चिठ्ठी लिहित असल्याने मी खोटं बोलणार नाही. २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मी घरात असतांना आरोपी चंद्रभान कायंदे, परमेश्वर वावरे आणि सुरेश कायंदे हे तिघे घरात बळजबरीने घुसले आणि त्यांनी माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेत. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण सुरेशने केले. ते चित्रीकरण लोकांना दाखवून माझी बदनामी केली. शिवाय माझी बदनामी करतो म्हणून मला त्यांच्याबरोबर संबंध ठेवण्यास भाग पाडले. आज मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करतेय. माझ्याकडे काही पुरावे नाहीत पण या तिन्ही नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. जेणे करून अस गैरकृत्य पुन्हा कुणीच नये. हे माझं अखेरच निवेदन आहे अशी मागणी या पीडितेने दोन पानी चिठ्ठीतून केली.

या विरोधात आपण सेनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. ३५४ प्रमाणे गुन्हा ही दाखल झाला होता पण न्यायाधीशांनी आपल्यालाच गुन्हेगारांची माफी मागायला लावली आणि गुन्हेगारांनी माझी पुन्हा गावात बोंब केल्याचे पीडिता सांगते. न्यायालयातच मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण लाईटने मला दूर फेकल्याने मी त्यात वाचले. माझ्या घरच्यांना हे माहिती झालं तर मला संभाळणार नाहीत म्हणून मी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. माझ्या कुटुंबीयांना यातील काहीच माहिती नाहीये. कृपया त्यांना त्रास देऊ नका अशी विनवणी ही या महिलेने पत्रातून केली.
या पत्राच्या आधारे सेनगाव पोलिसांनी पीडितेच्या पतीच्या फिर्यादी वरून चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्वर नारायण वावरे आणि सुरेश नामदेव कायंदे या तिघांविरोधात बलात्कार करून बदनामी केल्याचा आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवी 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय.
या घटनेमुळे एकच संतापाची लाट उसळली असून न्यायव्यवस्थेवर ही या पीडितेने आरोप केल्याने खळबळ माजली आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पीडितेच्या नातेवाईकांकडून आरोपींच्या अटकेच्या मागणी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरलीय.