अमीन शाह
सोशल मीडियावर झालेली ओळख एका परिचारिकेला चांगलीच महागत पडली आहे. विदेशातून महागडे गिफ्ट पाठविल्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. गिफ्ट तर मिळालेच नाही, मात्र गिफ्टच्या बदल्यात परिचारिकेला तब्बल 21 लाख16 हजार गमावावे लागले आहेत. या प्रकरणी येरवडा येथील 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार इन्स्टाग्राम साईटवरील प्रोफाईलधारक डेविल विल्यम्स याच्याविरुद्ध आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी महिलेची सोशल मीडियातून डेविल विल्यम्स असे नाव सांगणार्या एकाबरोबर ओळख झाली. त्यानंतर महिला आणि विल्यम्स यांच्यातील संवाद वाढत गेला. दरम्यान विल्यम्सने तिला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले होते. तक्रारदार महिला आमिषाला बळी पडली. त्यानंतर परदेशातून भेटवस्तू पाठविल्या असून सीमाशुल्क विभागाच्या ताब्यातून या वस्तू मिळवण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बतावणी करुन महिलेला बँक खात्यात वेळोवळी पैसे भरण्यास सांगण्यात आले.
महिलेने वेळोवळी बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने तब्बल 21 लाख 16 हजार रुपये जमा केले. मात्र खूप कालावधी वाट पाहिल्यानंतरदेखील फिर्यादी महिलेला परदेशातून पाठविलेले कोणतेही गिफ्ट आले नाही. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख करत आहेत.