अधिक मासानिमित्त अद्वैत कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय संगीतमय ज्ञानयज्ञ श्रीमद्भागवत कथा महोत्सवाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सांगता झाली. श्री. धनंजय जोशी व जोशी परिवाराच्या यांच्या पुढाकारातून आयोजित या धार्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
या कथामालेचे निरूपण भागवतकार स. भ. श्री. गणेश महाराज रामदासी यांनी आपल्या ओघवत्या वाणीने व संगीतमय शैलीत केले. कथेदरम्यान श्रीमद्भागवत महापुराणातील विविध प्रसंग, भगवान श्रीविष्णूंचे अवतार, भक्तीचे महत्त्व, संत परंपरा तसेच धर्म, संस्कार आणि समाजजागृतीचे संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. कथेच्या दुसऱ्या व चौथ्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे महत्त्व, विशेषतः वामन अवतार, तसेच भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “नंद के आनंद भयो, जय कन्हैयालाल की” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. याशिवाय समर्थ रामदास स्वामी महाराजांना विष्णू सहस्त्रनामाच्या मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात आला. या सोहळ्यामुळे उपस्थित भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा दिव्य अनुभव लाभला. कथा सप्ताहात दररोज भजन, कीर्तन, आरती, नामस्मरण व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तसेच महिला मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कथा श्रवणाचा लाभ घेतला. समारोपाच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसाद भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था आणि नियोजन याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. कथा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात श्री व सौ. जोशी परिवारासोबतच श्री व सौ. कुलकर्णी यांचेसह समाप्तीच्या दिवशी श्री लक्ष्मीकांत सबनीस,श्री,शिवकुमार दारुवाले,श्री राजु सिलमवार, सिद्दीकी सर,प्रवीण बोरखडे,प्रा.पराग हासे,बलराज मडीलगेकर,कदम मामा, गोडसे काका आदींनी कार्यक्रम यशस्वीसाठी पुढाकार घेतला. या कथा महोत्सवाच्या निमित्ताने अद्वैत कॉलनीतील नागरिकांची एकजूट, परस्पर सहकार्य, धार्मिक भावना आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडले. धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण कॉलनी एकत्र येऊन “एकता, भक्ती आणि सेवा” यांचा आदर्श निर्माण करण्यात यशस्वी ठरली. कॉलनीतील नागरिकांनीही अशा उपक्रमांमुळे सामाजिक सलोखा व आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी श्री. धनंजय जोशी, संपूर्ण जोशी परिवार, श्री व सौ. कुलकर्णी तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.